शिवराज्याभिषेकनिमित्त रातोरात गेवराई तालुक्यातील तलवाडा गावात बुधवारी रात्री अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. मात्र, ही स्थापना प्रशासनाच्या परवानगीविना झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवाडा गावातील गेवराई–माजलगाव राज्य मार्गावर 'छत्रपती शिवाजी महाराज चौक' आहे. अनेक वर्षांपासून या चौकात पुतळा बसवण्याची मागणी सुरु होती. यापूर्वीही अशाच प्रकारे पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला होता. पण पोलिसांनी तो रोखला होता. त्यामुळे यंदा शिवप्रेमींनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता रात्रभरात पुतळा उभारण्याचे नियोजन केले.
बुधवारी रात्री पुतळा उभारल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती मिळताच एपीआय मनोज निलंगेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर गुरुवारी सकाळी तहसीलदार संदीप खोमणे यांनी स्थळाची पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परवानगीशिवाय सरकारी जागेवर पुतळा उभारल्यामुळे संबंधित 30 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरीही दिवसभर गावातील नागरिकांनी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या प्रकारासोबतच आष्टी तालुक्यातील जामगाव येथे देखील शिवराज्याभिषेक स्थितीतील छत्रपतींचा पुतळा उभारण्यात आला. याप्रकरणी ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून चार तरुणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा