थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे काही मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे बहुतांश मंत्री गैरहजर राहिल्याने महायुतीत मतभेद वाढल्याची चर्चा सुरू झाली. निधीवाटप आणि अलीकडच्या पक्षांतरांमुळे शिवसेना मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सूचनांवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत गैरहजेरीमागे नाराजी नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “कोणताही मंत्री नाराज नाही. आज एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अर्ज छानणी सुरू असल्याने मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आपल्या प्रभारी जिल्ह्यांमध्ये गेले होते. हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने झाले असून बैठकीला गैरहजेरी ही नाराजी नसून निवडणुकीशी संबंधित कामांमुळे होती.”
अलीकडेच महायुतीतील अनेक नेत्यांनीच एकमेकांच्या पक्षात प्रवेश केल्याने नाराजी वाढल्याचे वृत्त होते. या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्याचे ठरले होते, पण काही अपरिहार्य परिस्थितींमुळे काही लोक भाजपमधून शिवसेनेत, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणि काही आमच्याकडे आले. त्यामुळे काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला असण्याची शक्यता आहे.”
ते पुढे म्हणाले की, या सर्व घडामोडींवर तिन्ही पक्षांचे प्रमुख लवकरच चर्चा करून निर्णय घेतील. त्यांनी मान्य केले की पक्षांतरांमुळे काही प्रमाणात नाराजी झाली असेल, मात्र आजच्या बैठकीतील गैरहजेरीचे ते कारण नव्हते. शिवसेना मंत्र्यांच्या या हालचालीमुळे महायुतीतील एकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात मोठ्या घडामोडी घडू शकतात.
थोडक्यात
राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे काही मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे बहुतांश मंत्री गैरहजर राहिल्याने महायुतीत मतभेद वाढल्याची चर्चा सुरू झाली.
शिवसेना मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सूचनांवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.