ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

उद्धव ठाकरेंच्या आत्मपरीक्षणाने महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण स्पष्ट

Published by : Team Lokshahi

“विधानसभा निवडणुकीतील पराभव टाळता आला असता, पण समन्वयाचा अभाव आणि आपल्यातून ‘मीपणा’ आला… ही आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक होती,” अशा स्पष्ट आणि प्रांजळ शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या निवडणूक धोरणावर सूचक भाष्य करत आत्मपरीक्षण केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद, महाविकास आघाडीतील अंतर्गत खेचाखेच, लोकसभा-विधानसभा निवडणूक नियोजनातील त्रुटी, आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडली.

‘मुख्यमंत्री म्हणून एकच अधिवेशन… आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे निर्णय’

“मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं एकच अधिवेशन झालं. आम्ही तेव्हा फक्त सात मंत्री होतो. कोणीही मागणी केली नव्हती, तरी मी दोन लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं. ज्यांनी वेळेवर कर्ज फेडलं, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देणार होतो. मात्र दुर्दैवाने कोरोनामुळे तो निर्णय पुढे जाऊ शकला नाही. पुढे सरकार पाडण्यात आलं,” असं ठाकरे यांनी सांगितलं.

‘मीपणा आला आणि आपण हरलो’

महाविकास आघाडीच्या विधानसभेतील पराभवाचे विश्लेषण करताना ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीचं यश सगळ्यांच्या डोक्यात गेलं. तेव्हा 'आपण जिंकायचं' हा भाव होता. पण विधानसभा आली, तेव्हा ‘मला’ जिंकायचं हा ‘मीपणा’ पुढे आला. समन्वय हरवला. त्यामुळेच जनतेला वाटलं की आताच खेचाखेची सुरू आहे, तर पुढे काय होईल?”

'लोकसभा होती, पण निशाणी नव्हती; विधानसभा होती, पण जागा नव्हत्या'

“लोकसभा निवडणुकीत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होत्या, पण शिवसेनेची अधिकृत निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कुणाला द्यायच्या यावरच ठाम निर्णय झाला नव्हता. या 'तू तू, मैं मैं' मध्ये वेळ गेला. ही आपल्याकडून झालेली सर्वात मोठी चूक होती,” अशी स्वच्छ कबुली देत ठाकरे यांनी आघाडीत पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर सूचक प्रतिक्रिया दिली – “ती चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ राहात नाही.”

ईव्हीएम, मतदार याद्या आणि बोगस मतदार'

ठाकरे यांनी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “ईव्हीएमच्या घोटाळ्याची चर्चा आहे. मतदार याद्यांवर संशय आहे. बोगस मतदार वाढले आहेत. अशा सगळ्या प्रश्नांवर खुली चर्चा होणं गरजेचं आहे. निवडणूक मोठी असेल तर वाद कमी होतात. मतदारसंघ छोटा असेल, तशी चुरस वाढते,” असं ते म्हणाले.

‘आघाडीत खेचाखेच, पण…’

महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदावर स्पष्ट भूमिका मांडताना ठाकरे म्हणाले, “जेंव्हा दोन-तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा खेचाखेच सुरू होतेच. युतीतही होत होती. महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढवली. आपण जिंकलेले मतदारसंघही सोडावे लागले. विधानसभेतही खेचाखेच चालूच राहिली. त्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला.”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Laxman Hake on Manoj Jarange : "चौथी नापास दिल्लीत काय करेल?" जरांगेंच्या दिल्ली मेळाव्यावर हाकेंची चिडचिड?

Ram Kadam on Sanjay Raut : बाळासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हळूहळू भाजपमध्ये..." राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर राम कदमांची प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय