(Arvind Sawant) नाशिकमधील तपोवनमध्ये झाडे तोडण्यावर राजकारण तापले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जवळपास 1800 झाडे तोडली जाणार आहेत, यावर विरोध सुरु आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनमध्ये जाऊन एकही झाड तोडू देणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. अरविंद सावंत म्हणाले की, "साधुसंत तुकारामांची आठवण असायला हवी, पण इथे निसर्गाची आणि जंगलाची किंमतच उरलेली नाही. 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडली जात आहेत? मुंबईत किती उंच इमारती आहेत, खाजगी शेतकऱ्यांची जमीन आहे. त्यांचा वापर करा, पण जंगलांवर हल्ला करणे योग्य नाही."
त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळात गोरेगाव जंगलावर मुंबई मेट्रो प्रकल्प सुरू होण्याच्या विरोधात दिलेल्या लढ्याचाही उल्लेख केला. "उद्धवजींनी त्या जंगलाचा विस्तार केला, पर्यावरणाचे संरक्षण केले. आता तपोवनमधील झाडे तोडण्याचा प्रश्न आहे. आम्ही याला विरोध करू, आणि आवश्यक झाल्यास रस्त्यावर उतरू," असं त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, जयकुमार गोरे यांच्या विधानावरही अरविंद सावंत यांनी भाष्य करत, "मी खासदार म्हणून संयम ठेवतो. पण जर ते मतदारांची थट्टा करत असतील, तर त्यांना विचार करायला हवं की त्यांच्या नवऱ्याची काय किंमत हे सरकार दाखवत आहे," असं त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.