जर तुम्ही अजूनही जुना iPhone किंवा iPad वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. YouTube ने अलीकडेच त्यांच्या अॅपचं नवीन अपडेट (व्हर्जन 20.22.1) जारी केलं असून, यामुळे iOS 16 किंवा त्यापुढील व्हर्जनवर चालणाऱ्या डिव्हाइसेससाठीच अॅपचा सपोर्ट उपलब्ध असेल. त्यामुळे iOS 15 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर असलेल्या डिव्हाइसेसवर YouTube अॅप चालणार नाही.
या बदलाचा फटका मुख्यतः iPhone 6s, iPhone 7, पहिल्या पिढीचा iPhone SE, iPad mini 4, iPad Air 2 आणि सातव्या पिढीचा iPod Touch वापरणाऱ्यांना बसणार आहे. हे डिव्हाइस iOS 15 पर्यंतचे अपडेट्स मिळवू शकतात, मात्र iOS 16 ला सपोर्ट करत नाहीत. जर तुमचं डिव्हाइस या यादीत येत असेल आणि iOS 16 ला अपडेट होऊ शकत नसेल, तर यापुढे तुम्हाला YouTube अॅप वापरता येणार नाही. मात्र, एक पर्याय म्हणून तुम्ही Safari किंवा इतर ब्राउझर वापरून youtube.com वरून व्हिडिओ पाहू शकता. पण अॅपमध्ये मिळणाऱ्या काही खास सुविधा जसं की, ऑफलाइन व्हिडिओ सेव्हिंग, स्मूथ स्क्रोलिंग किंवा उच्च दर्जाचं स्ट्रीमिंग, ब्राउझरमध्ये मिळणार नाहीत.
अॅप डेव्हलपर्सकडून जुन्या डिव्हाइसेसचा सपोर्ट बंद होणं ही नवीन गोष्ट नाही. याआधी WhatsApp नेही अशा जुन्या डिव्हाइसेससाठी सपोर्ट थांबवला होता. यामागचं कारण म्हणजे नव्या डिव्हाइसेसमध्ये अधिक चांगले सुरक्षा फीचर्स आणि परफॉर्मन्स असतो, ज्यामुळे अॅप्स अधिक चांगल्या प्रकारे चालतात. जर तुम्हाला YouTube अॅप वापरणं गरजेचं असेल, तर iOS 16 किंवा त्यावरील व्हर्जन सपोर्ट करणारा नवीन iPhone किंवा iPad घेण्याचा विचार करता येईल. जुन्या डिव्हाइसवर अॅप्स काम करत नसतील, तर हा अपग्रेड करण्यासाठी योग्य काळ असू शकतो.