नवी मुंबई पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत अपघात घडवणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याऐवजी मदत मागणाऱ्या जखमी तरुणालाच पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 21 परिसरातील रहिवासी चंदन कुमार हा दिव्यांग तरुण कामावरून घरी जात असताना एका वाहनाने त्याला धडक दिली. अपघात घडवणारा चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी तरुणाने तात्काळ ‘100’ क्रमांकावर फोन करून मदत मागितली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पुढे पोलीस ठाण्यात घडलेल्या घडामोडींवरून वाद निर्माण झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये जखमी तरुण पोलिसांशी बोलताना दिसतो. “मला लागलंय साहेब, मला चालता येत नाही,” असे तो सांगताना ऐकू येते. त्याने चालकाने दारू पिल्याची माहिती आधीच पोलिसांना दिल्याचा दावा केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी त्याची बाजू ऐकून घेतल्यासारखे वाटले; मात्र नंतर अचानक पोलिसांच्या भूमिकेत बदल झाल्याचा आरोप आहे.
‘चोराला सोडून संन्यासाला शिक्षा?’
या घटनेनंतर “चोराला सोडून संन्यासाला शिक्षा” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपघात करणाऱ्या चालकावर तत्काळ कठोर कारवाई झाली का, याबाबत स्पष्टता नसताना जखमी व्यक्तीलाच पोलिसांकडून दबाव टाकला गेल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका घटनेची आठवणही नागरिक करून देत आहेत. त्यावेळी एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण करून पैसे उकळल्याचा आरोप पोलिसांवर झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. सलग दोन प्रकरणांमुळे पोलिसांच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
पोलिसांचे ब्रीदवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असले, तरी अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अपघातग्रस्तालाच धमकी दिली जात असेल, तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू आहे का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र व्हायरल व्हिडिओनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. घटनेचा सत्यासत्य तपास आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.