कल्याण येथे लोकल ट्रेनमध्ये झालेल्या किरकोळ वादातून १९ वर्षीय अर्णव खैरेला झालेल्या मारहाणीने अखेर भीषण वळण घेतले आहे. या धक्कादायक घटनेनंतर तणावात गेलेला अर्णव घरी परतल्यावर आत्महत्या करत असल्याचे समोर आले असून, संपूर्ण राज्यात या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांनीही यावर भूमिका मांडण्यास सुरुवात केली असून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेचा संताप “परप्रांतीयांची दादागिरी थांबवण्याची वेळ आली” अर्णव खैरे प्रकरणाबद्दल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडे म्हणाले, “मुंबई आणि उपनगरांत परप्रांतियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मराठी तरुणाला फक्त भाषेबद्दल प्रश्न विचारला म्हणून मारहाण होणे हे कुठल्याही परिस्थितीत मान्य होऊच शकत नाही. महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांनी आता एकत्र येऊन या दादागिरीला तोंड द्यायला हवे.” ते पुढे म्हणाले, “परप्रांतीयांना पाठीशी घालणारे नेते, गट आता का गप्प बसले आहेत? अर्णवच्या प्रकरणात ते का काही बोलत नाहीत? या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मनसे पूर्णपणे अर्णवच्या कुटुंबासोबत आहे.”
अर्णववर नेमके काय घडले?
अर्णव खैरे मुलुंडमधील केळकर महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. तो दररोज ८.४० ची अंबरनाथ–कल्याण लोकल पकडून महाविद्यालयात जात असे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याचा प्रवास सुरू झाला, मात्र लोकलमधील प्रचंड गर्दीतून मार्ग काढताना तो समोरच्या प्रवाशाला “थोडा आगे हो” असे म्हणाला. यावरून त्या प्रवाशाने अर्णववर उलटसुलट प्रश्नांचा भडिमार केला – “मराठी येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का?” अर्णवने स्वतः मराठी असल्याचे सांगूनही परिस्थिती चिघळली आणि त्या व्यक्तीसह पाच जणांच्या टोळक्याने त्याला ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
घाबरलेल्या अवस्थेत अर्णव ठाणे स्थानकात उतरला आणि नंतर दुसऱ्या लोकलने मुलुंड येथे गेला. महाविद्यालयातही तो अत्यंत तणावग्रस्त होता. घरी परतल्यानंतर त्याला मळमळ, अस्वस्थता जाणवत होती. वडिलांना फोनवरून त्याने संपूर्ण घटना सांगितली. संध्याकाळी वडील घरी परतले तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून पाहिले असता अर्णवने गळफास घेतल्याचे आढळले.
शिवसेनेची भेट, खासदार श्रीकांत शिंदेंची चौकशीची मागणी
घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी अर्णवच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही अर्णवचे वडील लक्ष्मण खैरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी पोलिसांना दिल्याचेही निलेश शिंदे यांनी सांगितले.
कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश, राज्यभरातून संतापाची लाट
मराठी भाषेबद्दल प्रश्न विचारल्यामुळे एका तरुणाला जीव द्यावा लागणे ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे नागरिक सांगत आहेत. अर्णवचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत असून राज्यातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. अर्णव खैरेच्या मृत्यूने मुंबई–ठाणे परिसरातील लोकल प्रवासातील वाढती दादागिरी, असुरक्षितता आणि सामाजिक तणाव यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे