अमेरिकेच्या यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनने (USCC) काँग्रेससमोर सादर केलेल्या 800 पानी अहवालात पहलगाममधील 26 पर्यटकांच्या हत्येचा तपशील देताना तो दहशतवादी नव्हे, तर स्थानिक बंडखोरांनी केलेला हल्ला असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानची बाजू वरचढ ठरल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चीन-पाकिस्तानचा अपप्रचार?
अहवालात म्हटले आहे की, कारवाईनंतर चीनने आपल्या जे–35 लढाऊ विमानांची फ्रेंच राफेलशी तुलना करत भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने भारतीय फायटर जेट पाडल्याचे भासवण्यासाठी चीनने एआयच्या मदतीने बनावट दृश्ये तयार केली, असा उल्लेखही अहवालात आहे.
केंद्र सरकारच्या दाव्यांवर प्रश्न
भारताने पाकिस्तानला धडा शिकवला, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने प्रबळ शक्ती दाखवली असे सांगितले होते. मात्र, अमेरिकेच्या अहवालामुळे या दाव्यांवर शंका उपस्थित होऊ लागली आहे.
काँग्रेसची टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा अहवाल भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी आणखी एक “कठीण धक्का” असल्याचे म्हटले. तसेच सरकार हा अहवाल नाकारण्यासाठी वा विरोध करण्यासाठी पुढाकार कधी घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चीनचा फायदा
भारत-पाक छोटेखानी युद्धाचा चीनने मोठा उपयोग करून घेतल्याचेही अहवालात नमूद आहे. पाकिस्तानने या संघर्षात मोठ्या प्रमाणावर चीनी शस्त्रे व जे-३५ सारखी विमाने वापरली. यामुळे चीनला स्वतःच्या लष्करी क्षमतेची प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याची संधी मिळाली, असे निरीक्षण अहवालात नोंदवले आहे.