अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ गावातून शहरात आलेल्या दोन वर्गमित्रांच्या मैत्रीतून उभा राहिलेला विश्वासघात आणि त्यातून घडलेला धक्कादायक दरोडा अशी ही गुन्हेगारी कथानक आता पोलिस तपासात उलगडत आहे. प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात १५ नोव्हेंबर २०२४ च्या मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामागे त्यांचाच जुना मित्र बाळासाहेब चंद्रकांत इंगोले असल्याचे समोर आले आहे.
मैत्री ते वैर : मनस्तापातून कट
२००६ साली शहरात नोकरीसाठी आलेल्या इंगोलेला त्याचा वर्गमित्र लड्डा यांनी आपल्या कंपनीत काम दिले. मात्र नोव्हेंबर २०२४ मध्ये लड्डा यांच्या वडिलांच्या निधनानंतर गावात गेलेल्या इंगोलेने कंपनीत याची माहिती न दिल्यामुळे वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतोष लड्डा यांनी देखील इंगोलेला खडसावले आणि माफी मागण्यास सांगितले. याच प्रसंगाचा मनस्ताप इंगोलेच्या मनात खोलवर घर करून बसला आणि त्याने लड्डा यांना धडा शिकवण्यासाठी दरोड्याचा कट रचला, अशी कबुली इंगोलेने पोलिस चौकशीत दिल्याचे समजते.
गुन्हे शाखेचा सखोल तपास
पोलिसांनी तपासात ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि विविध तांत्रिक धागे एकत्र करून तपास लढ्यात प्रगती केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना ३१ मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील अॅड. अशोक घुगे यांनी सांगितले की, आरोपींनी संतोष लड्डा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याची माहिती मिळवून, आरोपी योगेश हाजबेला सांगून दरोड्याची योजना आखली होती.
दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याच्यासह इतर आरोपींकडून चोरी गेलेल्या मुद्देमालाची जप्ती, तसेच शहरातील इतर दरोड्यांमध्ये यांचाच सहभाग आहे का, हे तपासणे आवश्यक असल्याने पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपींच्या वकिलांची बाजू
आरोपींच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत सांगितले की, आमच्या पक्षकारांचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नाही. ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत, आणि पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत. दरोड्यानंतरही त्यांनी पोलिसांना चौकशीत सहकार्य केले, तरीही त्यांच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत, असा दावा करण्यात आला.