बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या निकटवर्तीयांचे विविध कारनामे पहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांच्या कारनाम्यामुळे त्याचा परिणाम नेत्यांना भोगावा लागत आहे. ज्यामध्ये सर्वात पहिला धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यापासून सुरुवात झाल्यानंतर, सुरेश धसांचे निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्या, संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके आणि आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्ती सुशील सोळंके यांच्यापर्यंत अनेक कारनामे पाहायला मिळत आहेत. बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांनी एका दुकानदाराला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीनं ही मारहाण केल्याची चर्चा आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून एका व्यक्तीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा सुशील सोळंके याला पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अर्ज दिला म्हणून आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयानं एका दुकानदाराला मारहाण केली. व्हायरल व्हिडिओमध्ये माजलगावच्या तहसीलदारांनाही सुशील सोळंकेने शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा सुशील सोळंके याला पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण होत आहे. त्या अशोक सोळंके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सादोळा ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशीची मागणी केली, म्हणून त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. दरम्यान या सुशील सोळंकेला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा असून त्याने 10 एप्रिल 2024 रोजी नदीपात्रामध्ये माजलगावच्या महिला तहसीलदारांना देखील शिवीगाळ केल्याचे अशोक सोळंके यांनी म्हटले आहे .