हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत धार्मिक महत्त्व असलेला महिना मानला जातो. यंदा श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरू होत असून 23 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. या कालावधीत एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहेत. हे सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. अनेक भाविक या कालावधीत उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि विविध पूजाविधी करतात.
यासाठी शिवभक्त श्रावण महिन्याची सुरुवात होताच देशातील 12 ज्योतिर्लिंगांना भेट देतात आणि शिवशंकराची आराधना करतात. श्रावण महिन्याची सुरुवात होताच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. देशातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात रोज सुमारे 20 हजार भाविक येतात. मात्र तुम्हाला महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास आणि त्याची पौराणिक कथा माहित आहे का? जाणून घ्या...
नाशिकपासून सुमारे 28 किमी अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर हे तिसऱ्या पेशव्या बालाजी बाजीरावांनी 1740- 1760 मध्ये एका जुन्या मंदिराच्या ठिकाणी बांधले होते. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर झाला आहे आणि ती त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळून वाहते. काळ्या दगडांपासून बनवलेले भव्य असे मंदिराचे बांधकाम आहे.
पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जाते की, याठिकाणी अनेक ऋषी एकत्र राहत होते, मात्र येथे असणारे ऋषी गौतम यांना अनेक ऋषी अपमानित करण्याचा प्रयत्न करत होते. ऋषी गौतम यांच्यावर एकदा तेथील ऋषींनी गोहत्येचा आरोप केला. एवढचं नव्हे तर त्यांना म्हटलं की, पाप धुण्यासाठी तुम्हाला गंगा देवीसोबत येथे यावे लागेल. यानंतर गौतम ऋषींनी शिवलिंगाची स्थापना करुन पूजा करण्यास सुरुवात केली.
ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांनी गंगाला वरदान म्हणून पाठवण्याची विनंती केली. मात्र गंगा देवीने सांगितले की जर भगवान शिव देखील या ठिकाणी राहतील तरच ती येथे राहील. त्यामुळे भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे राहण्यास तयार झाले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात तीन लहान शिवलिंगे आहेत जी ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेव म्हणून पूजली जातात.