छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू श्रीमंत छत्रपती व्यंकोजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू) यांचे थेट 13 वे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या तामिळनाडू प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे दुसरे यांनी मराठी, तामिळ, कन्नड, तेलगू आदी भाषेतील पहिले नाटकाचे लेखन केले. यासह एकूण 35 ग्रंथांचे लेखन केले. बहुभाषा पंडित असा त्यांचा लौकिक आहे.
तंजावर संस्थानच्या राजवाड्यात सरस्वती ग्रंथालय हे सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'शिवभारत' ग्रंथाच्या खंडासह अनेक दुर्मिळ ग्रंथसंपदा याचे जतन केले आहे. भाषा व संस्कृतीची परंपरा पुढे जोपासली जावी व आपल्या वैभवशाली इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीतील तरुणांना झाली पाहिजे, म्हणून साहित्य हे अंत्यत प्रभावी माध्यम असल्याची भावना नियुक्तीच्या निमित्ताने श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजीराजे यांचे मराठी, कन्नड, तमिळ तेलगू, हिंदी, इंग्रजी आदी भाषांवर प्रभुत्व आहे.
'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्षपदी युवराज संभाजीराजे भोसले यांना त्यांचे नियुक्तीपत्र 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिले. त्यांच्या निवडीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.