आशिया कप 2025 साठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघाने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवली आहे. यावेळी निवड समितीने काही कठीण निर्णय घेतले असून त्यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड. गिल गेल्या वर्षभरापासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता, तरीही त्याला केवळ संघात परत स्थान दिले नाही, तर थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याच ठिकाणी अक्षर पटेलचा "गेम" झाल्याची चर्चा आहे. यंदा इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत अक्षर उपकर्णधार होता. त्या मालिकेत भारताने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला होता आणि अक्षरने सहा विकेट घेतल्या होत्या. अशा वेळी त्याला वगळून गिलकडे झुकाव करणे, हा बीसीसीआयचा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे.
मात्र, गिलचा पुनरागमन हा सूर्यकुमार यादवसाठी मोठा धोका मानला जात आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मध्ये आजवर एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. तरीही उपकर्णधारपद गिलकडे गेल्यामुळे सूर्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर आशिया कपमध्ये सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीमचे प्रदर्शन समाधानकारक झाले नाही, तर निवड समिती त्याला बाजूला करून गिलला पुढचा कर्णधार म्हणून पुढे आणू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतामध्ये प्रत्येक फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे गिलला उपकर्णधार करून त्याला पुढील काळात सर्व फॉर्मेटचे नेतृत्व करण्यासाठी तयार करण्याची रणनीती निवडकर्त्यांनी आखली आहे, असे मानले जाते. याचाच भाग म्हणून गिलला अलीकडे कसोटी संघाचे नेतृत्वही देण्यात आले. रोहित शर्मा वनडे फॉर्मेटमध्ये खेळत असतानाच नेतृत्व बदलण्याची शक्यता कमी आहे, पण येत्या ऑस्ट्रेलिया मालिकेतदेखील गिलला उपकर्णधार बनवण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे एकाच वेळी अनेकांचे गेम झाले आहेत. अक्षर पटेलला उपकर्णधारपद गमवावे लागले, सूर्यकुमार यादवसाठी कर्णधारपद धोक्यात आले, तर शुभमन गिलसाठी भविष्यातील कर्णधारपदाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन कसे होते, त्यावरच या नव्या समीकरणांचा अंतिम निकाल ठरणार आहे.