Team India's new ODI Captain Announced : या क्षणाची मोठी बातमी क्रिकेट विश्वातून समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी 20I मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच एकदिवसीय कर्णधारपदाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्माऐवजी शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. तर सूर्यकुमार यादव टी 20I संघाचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिय दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.
शुबमन गिल याच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआय निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीसह टीम इंडियाच्या भविष्याबाबतही चर्चा करण्यात आली. निवड समिती अध्यक्ष आणि सदस्य यांच्यात शुबमनच्या नावावर एकमत झालं. त्यानुसार शुबमनला कर्णधार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कर्णधार म्हणून शुबमनच्या नावाची घोषणा करण्यात आली.
शुबममने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्येही सातत्याने खेळतोय. शुबमन तिन्ही फॉर्मेटसाठी सेट आहे. शुबमन फॉर्मेटनुसार खेळतो. ही वैशिष्ट्य पाहता शुबमनला कर्णधार करण्यात आलं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
मार्चमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी
शुबमनला मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी रोहित शर्मा याने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहितनंतर विराटनेही तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यामुळे शुबमनला कसोटी संघाच्या कर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली. शुबमनने रोहित-विराटशिवाय इंग्लंड दौऱ्यात धमाका केला. शुबमनने इंग्लंडला त्यांच्याच घरात मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. शुबमनने या मालिकेत बॅट्समन म्हणूनही चाबूक कामगिरी केली. शुबमनने या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये सर्वाधिक 754 धावा केल्या.