भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा आज सांगलीत विवाह सोहळा होणार होता. त्यासाठी मोठ्य थाटात तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हळद, संगीत नाईट असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. आज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. परंतु या लग्नाआधीच मोठे अघटित घडले आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना स्मृतीच्या लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. लग्नाच्या मुहूर्ताच्या अवघ्या काही तास अगोदर ही घटना घडली आहे. श्रीनवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थि असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाहुण्यांना घरी जाण्यास सांगितले
आपल्या वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे. वडिलांची प्रकृती चांगली झाल्यानंतरच पुन्हा विवाह सोहळा पार पाडण्यात येईल, असा निर्णय तिने घेतला आहे. त्यामुळेच सर्व पाहुण्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरकीडे स्मृती मानधानाचे कुटुंबीय सध्या श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत.
आज सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली होती. आम्हाला वाटलं बरी होईल. थोडावेळ थांबलो. त्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्मृतीचा वडिलांवर जीव आहे. त्यामुळे तिने जोपर्यंत वडील बरे होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही, असं ठरवलंय. डॉक्टरांनीही त्यांची तब्येत ठिक होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न पुढे ढकललं आहे. अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. मानधना कुटुंबाची प्रायव्हसी जपा, असं आवाहन आम्ही करतो.