परभणी हिंसाचार प्रकरण चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणाचे आज विधानसभेतही पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संदर्भात विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परभणी हिंसाचारप्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. मात्र, यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झालेला नाही: मुख्यमंत्री
परभणी हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा केला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झालेला नाही. सोमनाथ सूर्यवंशींना श्वसनाचा दुर्धर आजार होता, न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या छातीत अचानक जळजळ सुरु झाली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मग काय सूर्यवंशींनी स्वत:लाच मारुन घेतलं का? आव्हाडांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडिओज आहेत. मात्र तरीही सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत. सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला नाही, मग काय सूर्यवंशींनी स्वत:लाच मारुन घेतलं का? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड निलंबित
परभणी राड्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत घोरबांड हे निलंबित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय? मुख्यमंत्र्यांनी स्वत: विधानसभेत दिली माहिती
परभणीमध्ये १० डिसेंबर, २०२४ रोजी ४ साडेचारच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेली संविधानाच्या प्रतीचा अपमान केला. त्यानंतर पडसाद उमटायला सुरुवात झाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाने बसची काच फोडली. जमावापैंकी कुणीतरी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घातला. त्यानंतर वातावरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यामधील काही लोकांनी नंदीग्राम एक्सप्रेस रोखली. काही संघटनांनी परभणी जिल्हा आणि शहरात बंद पुकारला. ११ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन सुरू होतं. ७ शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मात्र, काही जमावांनी तोडफोड केली. गाड्या जाळल्या गेल्या. पोलीसांनी १२ वाजता जमावबंदी घोषित केली. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत फाईली फेकल्या तोडफोड केली. बाहेरून एसआरपीएफची कुमक मागवण्यात आली त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यात आली.
दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आलेल्या ४२ पुरुषांना अटक करण्यात आली. महिला आणि बालकांना अटक करण्यात आली नाही. समज देऊन सोडण्यात आलं. त्यानंतर व्हिडिओ फुटेजमध्ये जे लोकं तोडफोड करत होते. आंदोलन शांत प्रमाणे झालं. मात्र, २००-३०० लोकं उद्वेगाने आंदोलन करत होते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांनाच अटक करण्यात आलं होतं.
संविधानाची विटंबना करणारा आरोपी मनोरूग्ण आहे. आरोपीने केलेल्या कृत्याचा आणि सकल हिंदू समाजाच्या मोर्चाचा काही संबंध नाही. कॉन्सिरसी थेअरी तयार करून एक प्रकारे समाजात तेढ निर्माण केली जात आहे. ही कारवाई जाती द्वेषातून केली नाही. मनोरूग्णाने केलेल्या कृत्याने पुढील प्रकार घडला.
कोण आहेत सोमनाथ सूर्यवंशी
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे आंदोलक होते. ते कायद्याचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूरचे होते, त्यांचे कुटुंब आहे, ते पुण्यातही राहायला होते. सोमनाथ सूर्यवंशी हे परभणीत शिक्षण घेत होते. त्यांच्यासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, परभणीत जी जाळपोळ सुरु होती, त्या व्हिडीओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. सूर्यवंशी यांना दोनवेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारले की, पोलिसांनी तुम्हाला थर्ड डिगरी मारहाण केली का, तुम्हाला मारहाण झाली का? सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे फुटेजही उपलब्ध आहे. त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे दिसत नाही. पोस्टमार्टेम अहवालाचे पहिले पान सगळ्यांनी वाचले असेल. पण सूर्यवंशीच्या वैद्यकीय तपासणीत लिहले आहे की, त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एका खांद्याजवळचे हाडही तुटले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी असताना सकाळी छातीत जळजळ सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांना तिकडे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या सगळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संपूर्ण बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-