Anjali Damania vs Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी सचिव व्ही. राधा यांच्या चौकशी अहवालाची महत्त्वाची फाईल मुंडेंनी गायब केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, या फाईलच्या गायब होण्याची पुष्टी उपसचिवांनी लोकायुक्तांसमोर केली असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
245 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण पुन्हा चर्चेत
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना तब्बल 200 ते 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच करण्यात आला होता. भाजप आमदार सुरेश धस यांनी 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर दमानिया यांनीदेखील कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. या प्रकरणी हायकोर्टाने मुंडेंना दिलासा दिला असला तरी “त्यांना क्लीन चीट मिळालेली नाही,” असे दमानिया वारंवार सांगत आल्या आहेत.
फाईल गायब झाल्याचा दावा
दमानिया यांनी गुरुवारी ट्विट करत स्पष्ट केले की – “कृषी सचिव व्ही. राधा यांनी भ्रष्टाचार व अनियमिततेवर अहवाल तयार करून मंत्र्यांकडे पाठवला होता. मात्र, ती फाईल धनंजय मुंडेंकडे गेल्यानंतर परत आलीच नाही. लोकायुक्तांच्या सुनावणीदरम्यान उपसचिव प्रतिभा पाटील यांनीही ही बाब कन्फर्म केली. फाईल मंत्र्यांकडे जावक झाल्याचा क्रमांक नोंदवला गेला आहे. पण ती नस्ती शासनाकडे परत मिळाली नाही.”
दमानियांकडून पत्र शेअर
यासंदर्भात कृषी विभागाकडून अधिकृत पत्र दमानियांना पाठवण्यात आले असून ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की –
“कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त तक्रारीचा अहवाल तत्कालीन प्र.स. (कृषि) यांनी तत्कालीन कृषीमंत्र्यांकडे सादर केला होता. मात्र, सदर अहवाल मंत्रालयीन कार्यासनाकडे परत आलेला नाही. या अहवालाची प्रत उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन कृषी मंत्र्यांचे खासगी सचिव यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.”
लोकायुक्तांकडून लेखी उत्तराची मागणी
दरम्यान, लोकायुक्तांनी या प्रकरणात धनंजय मुंडेंना लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या घडामोडींमुळे पुन्हा एकदा कृषी विभागातील घोटाळ्याचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.