मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरा, मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. वसई-नायगावमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे. वसई, नायगाव परिसरातील रोशन पार्क सोसायटीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सोसायटीचे मेंटेनन्स न भरल्याने एका मराठी कुटुंबाला चक्क "मराठीला गोळी मारा" म्हणून अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वीटी मांडवकर यांची डिलिव्हरी झाल्यामुळे आणि त्यांच्या घरात चोरी झाल्याने त्यांनी सोसायटीचे मेंटेनन्स भरले नव्हते. त्यामुळे सोसायटीने त्यांचे पाणी बंद केले. सोसायटीमध्ये 91 फ्लॅट्स असून अनेक जणांनी मेंटेनन्स भरला नव्हता तरी देखील आपल्यावरच कारवाई का करण्यात आली, यावरुन त्यांनी तक्रार केली असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. याबाबतचा एक व्हिडिओ ही समोर आला असून, त्यावरून ही घटना उघड झाली आहे. सोसायी मेंटनन्सची नोटीस इंग्रजी मधून दिली होती पण ती मला मराठी मधून द्या मला इंग्रजी कळत नाही यावरून, सोसायटीच्या मिटिंगमध्ये हा प्रकार उघड झाला आहे. स्वीटी नथुराम मांडवकर या मराठी महिलेसोबत हा प्रकार घडला असून, तिने वसई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
वसई पोलिस स्टेशनमध्ये महिलेची तक्रार
महिलेने तक्रार देताना असं म्हटलं आहे की, तुम्ही मराठी लोकांनी फ्लॅट विकून जा, नाहीतर तुमचा आम्ही मानसिक आणि शारीरिक छळ करू अशी धमकी देत, सेक्रेटरीने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली. आपल्या घरातील लहाण मुलांवर कमिटीच्या सदस्यांकडून जादूटोणा केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला. तसेच या आधीही सेक्रेटरी आणि कमिटीच्या सदस्यांनी एका वृद्ध व्यक्तीच्या घरचा पाणीपुरवठा बंद केला होता आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच घडलेल्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असली तरी कमिटीकडून ते दिले जात नाही.