महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहे. बंद यशस्वी करण्यासाठी किंवा बंदला विरोध करण्यासाठी कोणत्याही नागरिक आणि व्यापाऱ्यांना बळजबरी करण्यात येऊ नये, अशा पद्धतीच्या सूचना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सकाळी 9 वाजता सम्राट चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होतील. सर्व कार्यकर्ते सुपर मार्केट येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करतील. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन रॅली निघेल.
या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस सतर्क असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 9 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 154 पोलीस अंमलदार, चार राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, 9 जलद प्रतिसाद टीम शहरातील बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत. अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.