बाप्पाचे आगमन अगदी अवघ्या काही दिवसांवर आले आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, या दिवशी घराघरात गणराय विराजमान होणार आहेत. प्रत्येकजण आपल्या बाप्पाचे स्वागत खास करण्यासाठी सजावटीत वेगवेगळेपणा आणण्याचा विचार करतो. कुणी आकर्षक मखर खरेदी करतो, तर कुणी लाईटिंग किंवा पडद्यांवर भर देतो. पण ही खरेदी कुठे केली तर बजेटमध्ये सुंदर सजावट होईल, असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी मुंबईतील काही लोकप्रिय बाजारपेठा सजावटीच्या साहित्यामुळे प्रसिद्ध आहेत.
दादर मार्केट – सजावटीचा स्वस्तात खजिना
गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी मुंबईकरांची पहिली पसंती म्हणजे दादर मार्केट. येथे प्रत्येक गल्लीमध्ये गणपती डेकोरेशनचे साहित्य होलसेल दरात उपलब्ध आहे. कृत्रिम फुलं, फुलांच्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, दिवे, पडदे, लाईटिंग – घर सजवण्यासाठी लागणारी जवळपास सगळी साधनं येथे मिळतात.
दादरमध्ये आकर्षक मखरांची किंमत केवळ ४०० रुपयांपासून सुरू होते आणि २५,००० रुपयांपर्यंत जाते. नेटचे पडदे २० रुपये प्रति मीटर तर टिकल्यांचे पडदे ४५ रुपये प्रति मीटरपासून उपलब्ध आहेत. शिवाय दादर पश्चिम भागात मोठे फुलांचे मार्केट असल्याने सजावटीसोबतच पूजेसाठी लागणारी ताजी फुलेही येथे खरेदी करता येतात.
क्रॉफर्ड मार्केट – कृत्रिम फुलांचा मोठा बाजार
मुंबईत खरेदी म्हटलं की क्रॉफर्ड मार्केट हे नाव आपोआप पुढे येतं. गणपतीच्या खरेदीसाठी हे ठिकाण नेहमीच गजबजलेलं असतं. इथे विशेषतः कृत्रिम फुलांचा मोठा संग्रह आहे. चिनी बनावटीची फुलं केवळ ३० रुपये डझन दराने मिळतात. कपड्याच्या माळा २५० ते ३५० रुपये, फायकस पती ६०० रुपये तर आकर्षक घरगुती सजावटीचे फुलांचे सेट ८०० रुपयांपर्यंत मिळतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स, मखर आणि सजावटीच्या वस्तू देखील येथे मोठ्या प्रमाणात मिळतात. क्रॉफर्ड मार्केट हे होलसेल खरेदीसाठी प्रसिद्ध असल्याने बजेटमध्ये भरपूर विविधता पाहायला मिळते.
भुलेश्वर मार्केट – कमी पैशात जास्त खरेदी
क्रॉफर्ड मार्केटच्या जवळ असलेले भुलेश्वर मार्केटही गणपती खरेदीसाठी तितकेच लोकप्रिय आहे. येथे स्वस्त दरात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ४०० रुपयांत १०० कृत्रिम फुलं, तर ४० रुपयांपासून फुलांच्या माळा किंवा तोरण मिळतात. सात रंगांतील २० डझन फुलांचा संच केवळ ७०० रुपयांत मिळतो. त्यामुळे कमी खर्चात घर सजवायचं ठरवलं तर हा बाजार सर्वोत्तम आहे.
ठाणे मार्केट – उपनगरातील बजेट-फ्रेंडली पर्याय
उपनगरातील रहिवाशांसाठी ठाणे पश्चिमेतील मोठी बाजारपेठही उत्तम पर्याय आहे. येथे विविध रंगांचे आणि डिझाईनचे पडदे ६० रुपयांपासून मिळतात. कृत्रिम फुलांच्या माळांची जोडी १५० रुपयांत, साध्या फुलांच्या माळा ५० रुपयांत तर फुलांच्या वेली १५० रुपये डझन दरात उपलब्ध आहेत. इथे बजेटमध्ये चांगली सजावट करायची असल्यास भरपूर पर्याय मिळतात.
गणेशोत्सवात बाप्पाचे स्वागत नेहमीच खास पद्धतीने केले जाते. मुंबईतील दादर, क्रॉफर्ड, भुलेश्वर आणि ठाणे मार्केट या चार बाजारपेठा गणपती सजावटीसाठी उत्तम मानल्या जातात. कुठे आकर्षक मखर मिळतात, कुठे कृत्रिम फुलांचा मोठा संग्रह आहे, तर कुठे बजेटमध्ये भरपूर खरेदी करता येते. त्यामुळे या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी घर सजवताना ही बाजारपेठांची सफर नक्की करा आणि स्वस्तात मस्त खरेदीचा आनंद घ्या.