ताज्या बातम्या

Weather Update : कधी थंडी, कधी पाऊस; फेब्रुवारीतच हवामानात मोठी उलथापालथ

कधी थंडी, कधी पावसाची शक्यता, तर कधी अचानक उकाडा अशा विचित्र स्थितीमुळे नागरिक गोंधळून गेले आहेत.

Published by : Varsha Bhasmare

राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत आहेत. कधी थंडी, कधी पावसाची शक्यता, तर कधी अचानक उकाडा अशा विचित्र स्थितीमुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारच्या सुमारास उकाडा जाणवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात चांगली थंडी जाणवत होती. मात्र जानेवारी महिन्यातच थंडी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

फेब्रुवारी महिन्यात तर काही भागांत पावसासह उकाड्याची स्थिती निर्माण झाली आहे. सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचे आजार आणि थकवा अशा तक्रारी वाढताना दिसत आहेत. राज्यातील तापमानाच्या आकडेवारीकडे पाहिले असता मोठी तफावत दिसून येते. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून तेथे किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. दुसरीकडे रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी तापमान 34.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी संपून आता उकाड्याचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून काही भागांत आजही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर भारतात मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तेथे कडाक्याची थंडी, दाट धुके, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळी दृश्यमानता शून्यावर आली असून थंडीचा प्रचंड फटका बसत आहे. काही भागांत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पूर्व राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुके पसरले असून थंड वाऱ्यांमुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे.

तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. गुलमर्ग, रोहतांग, कुल्लू आणि मनालीसारख्या उंचावरील भागांमध्ये 5 ते 16 सेंटीमीटरपर्यंत नवीन बर्फवृष्टी झाल्याची माहिती आहे. एकीकडे उत्तर भारतात कडाक्याची थंडी असताना दुसरीकडे महाराष्ट्रात उकाडा आणि पावसाचा संगम दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आणि हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा