बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावात स्वतःच्या पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ही घटना आज पहाटे दीड ते दोनच्या सुमारास घडली. अमृत भानुदास सोन्नर (वय 42) या मुलाने घरातच आपल्या आई चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय 70) यांचा दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्याने आईचे प्रेत घराबाहेर रस्त्यावर आणून टाकले.
घटनेनंतर गावातील काही नागरिकांनी संशय येताच अमृतला रंगेहात पकडले आणि तत्काळ अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. अमृतने स्वतःच्या आईचा खून नेमका का केला?, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. सदर घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.