बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर त्यांच्या नातेसंबंधांवर आणि घरातील वातावरणावर अनेक चर्चा रंगल्या. विशेषतः सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की, सोनाक्षीच्या लव आणि कुश सिन्हा या भावांना या विवाहाचा राग आहे आणि त्यांनी या नात्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. मात्र आता सोनाक्षीची चुलत बहीण पूजा रूपारेल हिने या सर्व अफवांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पूजा रूपारेल म्हणाली, “मी गॉसिप करण्यासाठी नाही, पण सत्य सांगण्यासाठी बोलते आहे. मी जहीरला भेटले आहे. तो अतिशय विनोदी आणि चांगला माणूस आहे. मला तो खूप आवडला. लोकांकडे खरंच किती वेळ असतो गॉसिप करण्यासाठी! जर लव आणि सोनाक्षीमध्ये मतभेद असते, तर त्यांनी ‘निकिता रॉय’ या चित्रपटात एकत्र काम केले नसते. शिवाय संपूर्ण सिन्हा कुटुंब ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये एकत्र आले होते. त्यामुळे ही वादाची बातमी पूर्णपणे खोटी आहे.”
पूजाने पुढे सांगितले की, सोनाक्षी आणि जहीर यांच्यात “खूप प्रेम आणि आपुलकी आहे”. ते दोघे एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घेतात आणि एकमेकांना पूरक ठरतात. ती म्हणाली, “सोनाक्षीची आई पूनम सिन्हा मला लहानपणापासून ओळखतात. त्या मला आपल्या मुलीसारखं प्रेम देतात. संपूर्ण सिन्हा परिवार अतिशय घट्ट बांधलेला आहे, पण लोकांना स्वतःच्या गोष्टी बनवण्यात मजा येते.”
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. या लग्नात फक्त कुटुंबीय आणि काही जिवलग मित्र उपस्थित होते. मात्र, या विवाहामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या, कारण सोनाक्षीने वेगळ्या धर्मातील व्यक्तीशी विवाह केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
तरीही सोनाक्षी आणि जहीर दोघेही आपलं वैवाहिक आयुष्य आनंदात जगत आहेत. ती नियमितपणे सोशल मीडियावर पतीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, आणि चाहत्यांकडूनही त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो.