मराठवाड्यात 2025-26 च्या खरीप हंगामात पेरणीचे चित्र बदलले असून, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांची पेरणी समाधानकारक झाली आहे. मात्र, पारंपरिक ऊस व अन्नधान्यांमध्ये मोठी घट दिसून आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या ताज्या अहवालानुसार, शेतकऱ्यांनी बदलत्या हवामान आणि बाजारपेठेतील स्थिती लक्षात घेऊन पीक पॅटर्नमध्ये मोठा बदल केला आहे.
यंदा सोयाबीनचे क्षेत्र विक्रमी असून 22.98 लाख हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना प्रत्यक्ष पेरणी 23.28 लाख हेक्टरवर झाली आहे, जे 101.31 टक्के आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे, कमी उत्पादन खर्चाचे आणि बाजारपेठेत मागणी असलेले नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी याकडे कल वाढवला आहे. कापूस पिकाची पेरणी 14.79 लाख हेक्टर क्षेत्रासाठी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 11.87 लाख हेक्टरवर झाली असून 80.29 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. दरवाढीची अनिश्चितता असली तरी शेतकऱ्यांनी पारंपरिक विश्वास कायम ठेवला आहे.
पारंपरिक ऊस लागवडीत मोठी घट झाली असून, 3.24 लाख हेक्टरच्या तुलनेत केवळ 9,480 हेक्टरवर म्हणजेच फक्त 2.93 टक्के क्षेत्रावरच लागवड झाली आहे. वाढलेला उत्पादन खर्च, पाणी टंचाई आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे ऊसाची निवड मोठ्या प्रमाणात टाळली गेली आहे. ज्वारीच्या बाबतीतही अशीच स्थिती दिसून येते. 78,888 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 13,115 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जे फक्त 16.62 टक्के आहे.
मक्याचे क्षेत्र 85,653 हेक्टर असून त्यापैकी 35,382 हेक्टरवर पेरणी झाली आहे, जे 41.31 टक्के इतके आहे. मका हे कमी कालावधीचे आणि चांगले उत्पादन देणारे पीक असल्याने काहीशी स्थिर पेरणी झाली आहे.
कडधान्य पिकांमध्ये तूर आणि उडीद यांची स्थिती तुलनात्मक स्थिर आहे. तुरीची पेरणी 4.45 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 3.72 लाख हेक्टरवर (83.44 टक्के) झाली आहे. उडीदचे सर्वसाधारण क्षेत्र 1.44 लाख हेक्टर असून, 1.17 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जे 81.07 टक्के आहे.
मराठवाड्यात एकूण खरीप पेरणी (ऊस वगळता) 49.72 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 44.70 लाख हेक्टरवर झाली आहे, हे 89.90 टक्के इतके आहे. तर एकूण अन्नधान्य क्षेत्र 11.69 लाख हेक्टर असून, त्यापैकी 9.43 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे, म्हणजेच 80.72 टक्के.
या आकडेवारीतून स्पष्ट होते की, शेतकऱ्यांचा कल आता नगदी पिकांकडे अधिक आहे. पारंपरिक पिकांमध्ये घट झाल्याचे कारण हवामानातील अनिश्चितता, पाणी उपलब्धतेचा प्रश्न आणि वाढलेला उत्पादन खर्च हे आहे.
शेवटी, बदलत्या हवामानाचा आणि बाजारपेठेतील चढउतारांचा परिणाम शेतकऱ्यांनी ओळखला आहे. म्हणूनच त्यांनी कमी कालावधीतील, कमी खर्चिक आणि तुलनात्मक सुरक्षित असलेल्या पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात सेंद्रिय शेती, जलसंधारण, पीक विविधता आणि बाजारपेठ स्थिरता यावर भर देण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा