नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताची सध्या संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. 2025 ला निरोप देताना सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी राज्य शासनाने मद्यप्रेमींना मोठा दिलासा दिला आहे. मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार 25 आणि 31 डिसेंबर रोजी निर्धारित वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हे सेलिब्रेशन करताना तरुणाईने शिस्त पाळणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वेळेची नवी मर्यादा काय?
शासनाच्या निर्णयानुसार, (FL-2) रात्री एक वाजेपर्यंत विदेशी मद्य विक्रीची दुकाने सुरू राहतील. ज्या बिअर बारना (FL-3 आणि FL-4) पोलीस आयुक्तालय क्षेत्रात परवानगी आहे, ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच पहाटे पाच पर्यंत ई-नमुना (बिअर बार) धारकांसाठी देखीलसवलत देण्यात आली आहे. ‘सीएल-3’ प्रकारच्या देशी दारूच्या दुकानांनाही रात्री एक वाजेपर्यंत मुभा असेल. ही सवलत केवळ उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिली असली, तरी सार्वजनिक शांतता राखण्याची जबाबदारी नागरिकांवरही आहे.
तरुणाईसाठी धोक्याची घंटा: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ टाळा!
उत्सवाच्या भरात अनेकदा तरुण वर्ग उत्साहाच्या अतिरेकात वाहने वेगाने चालवतात किंवा मद्यपान करून स्टिअरिंग हातात घेतात. हे केवळ स्वतःसाठीच नाही, तर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांसाठीही जीवघेणे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस यंदा अधिक सजग झाले असून ठिकठिकाणी ‘ब्रीथ अॅनालायझर’सह तपासणी केली जाणार आहे. “सेलिब्रेशन करा, पण घरी सुरक्षित पोहोचा,” हाच संदेश प्रशासनाकडून दिला जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि कडक नजर
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तालयांनी कंबर कसली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणारे आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. अनेक गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात असतील. जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार वेळेच्या सवलतीत बदल करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
अवैध मद्यावर चाप: राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट
उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा असली, तरी बेकायदेशीररीत्या होणारी मद्यविक्री आणि बनावट दारू रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सवलतीच्या नावाखाली अवैध साठा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अधिकृत परवानाधारक ठिकाणांहूनच खरेदी करावी, अन्यथा आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
जबाबदार नागरिक बना, आनंदाने स्वागत करा!
शेवटी, नवीन वर्षाचे स्वागत हे उत्साहाने आणि सकारात्मकतेने व्हायला हवे. व्यसनाच्या आहारी जाऊन किंवा कायद्याचा भंग करून वर्षाची सुरुवात पोलीस स्टेशन किंवा रुग्णालयात होणार नाही याची काळजी तरुणांनी घेतली पाहिजे. मित्रांसोबत पार्टी करताना ‘डिझिग्नेटेड ड्रायव्हर’ (जो मद्यपान करणार नाही असा मित्र) निवडा किंवा कॅबचा वापर करा. सुरक्षित रहा आणि 2026 चे स्वागत जबाबदारीने करा!