हाकेला धावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा हनुमान म्हणून अकोल्यातील तपे हनुमानावर भाविकांची श्रद्धा आहे. ह्या मंदिराला साडेचारशे वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. याठिकाणी महाबली हनुमान माता अंजनीसोबत विराजमान आहेत. माता अंजनीसोबत विराजमान असलेलं हे भारतातील दुसरं मंदिर असल्याचंही सांगितलं जातं.
मंदिराचे पुजारी भरत शर्मा यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद
माता अंजनीसोबत असलेल्या हनुमान मंदिरात आल्यावर सात्विक अनुभूती आणि ऊर्जा मिळते, अशी श्रद्धा भाविकांची आहे. एरवी फक्त हनुमानाचं मंदिर आपण पाहतो , मात्र अकोल्यात तपे हनुमान मंदिरात माता अंजनीसोबत हनुमान असल्याने याठिकाणी स्त्रिया ओटीसुद्धा भरू शकतात.
आई-वडील लहान बाळाच्या इच्छा पूर्ण करत असतात, त्याचप्रमाणे अकोल्यातील तपे हनुमान मंदिरात महाबली आपल्या मातेबरोबर विराजमान असल्याने भक्तांच्याही मनोकामना पूर्ण होतात, असं भाविक सांगतात. भारतात हनुमान मंदिरं अनेक आहेत, आणि त्यांचे भक्तही लाखोंच्या संख्येत आहेत. मात्र माता अंजनीसोबत असलेल्या विदर्भातील ह्या एकमेव मंदिराला वेगळच महत्व आहे. त्यामुळेच महाबली हनुमान आणि माता अंजनीच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. भाविकांनी लोकशाही मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे.