एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून आपण ती कुलूपबंद ठेवतो. मात्र अकोला जिल्ह्यातील एका गावात चक्क पाण्याला कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली आहे. कारण इथल्या लोकांना भीती आहे ती म्हणजे पाणी चोरी होण्याची आहे. ड्रममधलं पाणी कुणी चोरून नेऊ नये म्हणून लोकांनी आता ते कुलुपबंद केलं आहे. अकोल्यातील विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोल्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे. अकोल्यात तब्बल पाच दिवसांनंतर पिण्याचे पाणी सोडलं जात आहे. त्यातच अनेक भागांमध्ये पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होतोय. मात्र प्रशासन अद्यापही कोणतीही उपाययोजना करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक शकुंतला जाधवांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे, म्हणाले की, "खारपाण पट्यातील उगवा हे जवळपास पंधरा हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावांना एक-एक, दीड-दीड महिना पाणी मिळत नाही. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने, गावकरी दिवसभर शेतात असतात. त्यामुळे मिळालेलं पाणी चोरीला जाऊ नये, म्हणून लोकांनी पाण्याच्या टाकीला कुलूप लावल आहे ".
ग्रामस्थ सचिन बहाकार यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. म्हणाले की, "राज्यात वाढत्या उन्हाने कहर केलाय. तर दुसरीकडे पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय. आता तर भरलेल्या पाण्याच्या पिंपाला कुलूप लावण्याची वेळ आलीय. मात्र, सरकार आणि प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात दंग आहे. त्यामुळे, या पाणीटंचाईवर तातडीने ठोस उपाय करण्याची वेळ येऊन ठेपली आहे".