मुंबईतील घाटकोपर परिसरात शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. एल.बी.एस. मार्गावर वेगाने धावणारी एक मोटारगाडी नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली आणि थेट काही दुकानांवर जाऊन आदळली. या धडकेत पदपथावर झोपलेले तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाजवळ सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अचानक आलेल्या गाडीने दुकानाच्या पायऱ्यांवर धडक दिली आणि त्या वेळी तेथे झोपलेले लोक तिच्या चपेटात आले. अपघात इतका भीषण होता की, काही दुकानांचेही नुकसान झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवून जखमींना रुग्णालयात हलवले.
प्रत्येक्षदर्शींच्या मते, गाडीमध्ये दोन तरुणी आणि एक तरुण होता. हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी गाडीतून बाहेर पडलेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे.
सध्या जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला असून, मद्यप्राशन करून वाहन चालवले का याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे.