संतोष आवारे, अहमदनगर
राज्यात काल दहावीचा निकाल लागला तर अहमदनगरला 94 टक्के निकाल लागलाय. मात्र यात एका निकालाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.भारती भीमराव शिंदे-भगत यांना दहावीत 54 व्या वर्षी 54 टक्के मार्क पडल्याने त्यांचं कुटुंबासह सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या प्रयत्नाला घरातील सर्वच सदस्यांची मद्दत झालीये. खासकरुन डिलिव्हरीला आलेल्या मुलीने त्यांचा अभ्यास करून घेतला. तर 17 नंबर फॉर्म भरून बाहेरून परीक्षा देण्यापेक्षा रात्र शाळेमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
रात्री अकरा ते साडेबारा आणि पहाटे तीन ते पाच असा नित्याने अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवलं आहे. वयाच्या तेराव्या वर्षी लग्न झाल्याने शिक्षण अपूर्ण राहिले मात्र पुढे अंगणवाडीमध्ये मदतनीसची नोकरी मिळाली नोकरी मिळाल्यानंतर आपण दहावीची परीक्षा देऊन पास व्हावं अशी इच्छा निर्माण झाली आणि रात्र शाळेत प्रवेश घेऊन दहावीची परीक्षा दिली.
तसेच अभ्यासासाठी मुलगा मुलगी आणि सून यांनी मदत केलीये. जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर आपण कुठल्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकतो असा आत्मविश्वास भारतीयांना असल्याने त्यांनी हे यश मिळवलं आहे.