एसटीने प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. एसटी बस कुठे आहे?, किती वेळात स्थानकात पोहचणार हे आता एका क्लिकवर समजणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने सर्व सेवांमध्ये‘ व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम’(व्हीटीएस) कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) हे ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा मोबाईलद्वारे समजणार आहे.
एसटी महामंडळाने ५० टक्के तिकीटाचे दर कमी केल्यानंतर महिलांचा ओढा एसटीकडे जास्त वळला आहेत. परंतू आपली बस कुठे आहे?, किंवा कधी येणार हे समजत नाही. त्यामुळे तासांनतास एसटीची वाट पाहत बसावे लागत होते. पण आता तसे होणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता एसटी बसमध्ये जीपीएस बसवण्यास सुरुवात केली आहे. महापरिवहन मंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन एसटी बसमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. पण जुन्या बसमध्ये जीपीएस बसवण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या १६ हजार ८५२ बसगाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्यात स्थानक आणि आगार मिळून ३६५ ठिकाणी एकूण ५३८ प्रवासी माहिती प्रणाली (पीआयएस) बसविण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. प्ले स्टोअरवर‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप प्रवाशांना वापरता येईल.