राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या फरकाची हप्ता रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी २४ फेब्रुवारी रोजी ‘बोंब मारो’ आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचारी संघटनांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शासनाच्या अर्थ खात्याकडून वेतनवाढ फरकाचा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात मिळणारा वेतनवाढ फरकाचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. “वेतनवाढीचा फरक हा आमचा हक्क असून तो वेळेत मिळणे आवश्यक आहे. अर्थ खात्यातील संबंधित अधिकारी यासाठी जबाबदार आहेत,” असा आरोप संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे.
दरम्यान, आंदोलनासंदर्भातील अधिकृत नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आली आहे. अपर सचिवांकडेही या संदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २४ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील विविध आगारांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळातील हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. वेतनवाढ फरकाचा हप्ता तात्काळ वितरित करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा आणि प्रशासन यावर या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.