शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे एसटीशी एक वेगळंच, घट्ट नातं असतं. दररोज शिक्षणासाठी दूरवर प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी एसटी ही एक अविभाज्य सोय ठरली आहे. मात्र, दरवर्षी एसटीचा पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी स्टँडवर तासन्तास रांगेत उभं राहावं लागतं, ही बाब पालक आणि विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एक अभिनव आणि विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना एसटी पाससाठी स्टँडवर जाण्याची गरज नाही, तर एसटी पास आता थेट त्यांच्या शाळेत दिले जाणार आहेत. या संदर्भातील अधिकृत घोषणा परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
राज्यातील शाळा दिनांक 16 जूनपासून सुरू होत असून, त्याआधीच ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करतील आणि त्यानुसार पास वाटप करतील. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचा वेळ आणि ऊर्जा वाचणार असून, त्यांचा शिक्षणाकडे अधिक कल लागणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विशेषतः फायदेशीर ठरेल. राज्यभरातून या उपक्रमाचे स्वागत होत असून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.