छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे २ जूनपासून ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबवले जात आहे. हे विशेष अभियान ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार असून, ग्रामीण व शहरी भागातील बालकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अभियानाच्या काळात आशा व आरोग्य कर्मचारी गावांतील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा आणि अन्य शासकीय संस्थांमधील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करतील. अतिसाराची लक्षणे आढळल्यास त्वरित ‘ओआरएस’ आणि ‘झिंक सप्लिमेंटेशन’ देण्यात येईल.
आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस आणि झिंकचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. याशिवाय, स्तनपानाला प्रोत्साहन देणे, रोटा व्हायरस लसीकरण, स्वच्छ पाणी, आणि हातांची स्वच्छता याविषयी जनजागृती केली जात आहे. अंगणवाड्यांतील बालक, शाळांतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवली जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर आणि जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी नागरिकांनी सहकार्य करून बालमृत्यू रोखण्याच्या या प्रयत्नात भाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.