थोडक्यात
मुंबई महापालिकेने यंदा रस्त्यांवर फटाके विक्रीवर बंदी
गेल्या वर्षी 250 किलो फटाके जप्त
अनधिकृत विक्री, अॅटमबॉम्ब आणि रात्रीच्या फटाक्यांवर निर्बंध लागू
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, घराघरात उत्साहाचे वातावरण आहे. (Mumbai Firecracker Ban) साफसफाई, फराळ, कंदील, पणत्या या तयारीने सगळीकडे जल्लोष आहे. मात्र या सणाचा अविभाज्य भाग असलेल्या फटाक्यांवर यंदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेने यंदा रस्त्यांवर आणि पदपथांवर फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाईसह त्यांचा माल जप्त केला जाणार आहे. 15 ऑक्टोबरपासून ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवली जाणार असून, विशेषत: अंधेरी, दादर आणि कुर्ला भागातील अवैध विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. गेल्या वर्षी 250 किलो फटाके जप्त झाल्याने यंदा प्रशासनाने अधिक सतर्कता दाखवली आहे.
अनधिकृत विक्री, अॅटमबॉम्ब आणि रात्रीच्या फटाक्यांवर निर्बंध लागू
दरम्यान, पुण्यातही फटाके फोडण्यासंबंधी पोलिसांनी नवीन नियमावली लागू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके वाजवण्यावर बंदी असेल. मात्र आवाज न करणारे फटाके जसे की फुलबाजी आणि अनार या वेळेनंतरही लावण्यास परवानगी आहे.
याशिवाय, अॅटमबॉम्बसारखे स्फोटक फटाके आणि 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. रुग्णालये, शाळा, न्यायालये अशा “सायलेंट झोन” म्हणून घोषित परिसरांपासून 100 मीटर अंतरावर फटाके वाजवण्यासही सक्त मनाई आहे.
एकूणच, दिवाळीचा आनंद कायम ठेवत पर्यावरण आणि सुरक्षिततेचा विचार करता प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नागरिकांनीही जबाबदारीने पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.