मुंबई गोरेगावमधील विवेक महाविद्यालयात लागू करण्यात आलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयावरून आज तणावाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींनी सकाळपासूनच कॉलेजसमोर आंदोलन छेडत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनाची intensity वाढताच एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख यांनीही ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना साथ दिली. त्यानंतर परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला.
कॉलेज प्रशासनाने सुरक्षा आणि ओळख पटवण्यासंबंधी अडचणींचा मुद्दा मांडत काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या आवारात बुरख्यावर बंदी घातली होती. मात्र या निर्णयावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बुरखा काढण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या. एमआयएमच्या समर्थनानंतर आंदोलनाला गती मिळाली आणि काही तासांपर्यंत परिसरात मोठी गर्दी जमली होती.
या स्थितीत पुढे मनसेचे कार्यकर्तेही कॉलेजमध्ये दाखल झाले. शाळा–महाविद्यालयात अशा प्रकारची आंदोलने होऊ नयेत, असा दावा करत मनसेने प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मते, बुरखा घातल्यावर विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यास अडथळे निर्माण होतात आणि परीक्षांमध्ये गैरप्रकार घडण्याची शक्यता वाढते. “शैक्षणिक परिसरात कोणत्याही धर्माचा विरोध नाही, पण ओळख लपेल अशा गोष्टींना परवानगी देऊ नये,” असे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे, आंदोलक विद्यार्थिनींचा आग्रह कायम होता की कॉलेज प्रशासनाने अचानक घेतलेला बुरखाबंदीचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा. काही तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी विद्यार्थिनींना शांतपणे परिसरातून बाहेर हलवले. सध्या परिसरात कडक पोलीस उपस्थिती असून कॉलेजच्या प्रवेशद्वारावर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात आहेत.
बुरखाबंदीचा निर्णय, त्याविरोधातील आंदोलन आणि मनसे–एमआयएम यांच्या प्रवेशामुळे काही काळ गोरेगाव परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते. पुढील निर्णय कॉलेज प्रशासन व पोलिसांवर अवलंबून असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.