(B Sudarshan Reddy) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी INDIA आघाडीकडून माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. “सर्व विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डींचे नाव निश्चित केले आहे. लोकशाहीला बळकटी देणारा हा निर्णय आहे,” असे खर्गे म्हणाले.
रेड्डी हे कायदा व न्यायव्यवस्थेतील मान्यवर व्यक्तिमत्व मानले जाते. 1946 मध्ये जन्मलेले रेड्डी यांनी 1971 मध्ये वकिलीला प्रारंभ केला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात शासकीय वकील, केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील तसेच उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. 1995 मध्ये ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. 2005 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2011 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2013 मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता, मात्र वैयक्तिक कारणास्तव काही महिन्यांतच त्यांनी राजीनामा दिला.
दरम्यान, सत्ताधारी एनडीएने आधीच आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तमिळनाडूतील ज्येष्ठ भाजप नेते सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राधाकृष्णन यांचे वय 67 असून संघटनात्मक राजकारणात त्यांचा चांगला अनुभव आहे. लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मतांवर आधारित या निवडणुकीत एनडीएचे बहुमत असल्याने राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
निवडणुकीसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट असून मतदान 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव 21 जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी आणि एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असतील.