आज विधानसभेचे विशेष अधिवेशन आहे. विधीमंडळात पुढील दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यातच शपथविधी सुरु असताना विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले असून विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधक शपथ घेणार नाही आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा मतदारांचा अवमान आहे. हे एक पवित्र कार्य आहे. ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांची सेवा करण्याचा संकल्प या शपथ कार्यक्रमातून आपण करत असतो.
ही शपथ घेताना ज्यांना मतदारांनी निवडून दिलं त्यांनी शपथेवर बहिष्कार टाकावा जे आमदार निवडणुकीमध्ये मतदारांनी एखाद्या गावात बहिष्कार टाकला हेच ते नेते आहेत त्यांना समजवायला जायचं तुम्ही बहिष्कार टाकू नका आणि तेच शपथविधीवर बहिष्कार टाकतात.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, देवा या सर्वांना सदबुद्धी दे. या लोकशाहीच्या परंपरेचं जतन करण्याची सदबुद्धी देवाने यांना द्यावी आणि देवाने यांना सदबुद्धी दिल्यावर हे सदबुद्धीने वागले नाहीत तर जनता 2029 मध्ये यांचा हिशोब पूर्ण करेल. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.