अनियमित हवामान, आधी अवकाळी पावसाचा तडाखा आणि नंतर वेळेआधी दाखल झालेला मान्सून , उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यांमुळे यंदा देशातील साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट पाहायला मिळत आहे . महाराष्ट्रातील साखर उत्पादन तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी घटले आहे. यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे. उसाचे उत्पादन कमी आणि साखर उतारा यामुळे ही घट झालेली पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये 315.40 लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यात 58 लाख टनांची घट होऊन, चालू हंगामात ते 257.40 लाख टनांपर्यंत खाली आले आहे. या हंगामात 533 साखर कारखान्यांपैकी 380 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. ऊस गाळप ही 276. 75 लाख टनांपर्यंत घसरले आहे.मात्र ऊसाच्या उत्पादनातील घट साखरेचे दर वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. साखरेच्या दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उसाच्या गळितावर आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम झाल्याने साखर कारखाने लवकर बंद होत आहेत.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उत्पादनात अग्रेसर राज्यांतील साखर उद्योगाला यामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी 534 कारखान्यांपैकी केवळ 240 कारखाने बंद झाले होते. मागील वर्षी 92 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते आणि यंदा 84 लाख टन उत्पादन झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग चालू आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचे दर वाढवण्याची शक्यता निर्माण आहे. महाराष्ट्र उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणावर घट झालेली पाहायला मिळत आहे.
पुढील हंगामापर्यंत साखर टंचाई भासणार नाही
यंदा साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली जरी पाहायला मिळाली तरी साखर टंचाई भासणार नाही. असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. कारण ऊस लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात येणार असल्याने भविष्यात साखरेचे उत्पादन जास्त होईल असा अंदाज आहे.