महायुतीचे नेते सुजय विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या भविष्यासाठी कुठेतरी आता थांबले पाहिजे अश्या शब्दात त्यांनी आपले मत मांडले. तसेच अबू आझमी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत त्यांनी वारकऱ्यांविरुद्ध विधान केल्यास त्यांचा महायुतीतर्फे योग्य तो बंदोबस्त करू असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या भवितव्यासाठी सगळ्यात पहिले संजय राऊत यांनी थांबलं पाहिजे. खरं पाहायला गेलं तर ज्याला थांबायला पाहिजे तो थांबत नाही आणि ज्याला नाही थांबायला पाहिजे तो थांबतोय हे शिवसेनेचं मोठं दुर्दैव आहे. विधानसभेमध्ये मोठा पराभव होऊनही जर काही लोकांच्या स्वभावात बदल होत नसेल तर त्यासाठी तेच लोक दोषी आहेत.संजय राऊत वेळीच थांबले नाहीत तर येणाऱ्या काळात मुंबईतील सगळ्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचा पराभव पाहायला मिळेल. अश्या शब्दात सुजय विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले.
अबू आझमी हे स्वतः वादग्रस्त व्यक्तिमत्व असून कायम वादग्रस्त वक्तव्य करण्यात उस्ताद आहेत. त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगावा लागला आहे. वारीची संस्कृती ही केवळ महाराष्ट्राची संस्कृती नसून संपूर्ण देशातील हिंदू धर्माची पवित्र परंपरा आहे. त्याविरुद्व अबू आझमी यांनी विधान केल्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. देशातील सर्व देवस्थानांपैकी फक्त पंढरपूरच्या वारीला सामान्यातला सामान्य माणूसही जातो. वारीमध्ये चालत जाणारा व्यक्ती हा स्वकष्टाने स्वखर्चातून पायीपायी चालत जातो. त्यामुळे अश्या थोर लोकांचा अपमान केला तर महायुतीच्या वतीने त्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची जबाबदारी आमची असेल. अश्या शब्दात त्यांनी अबू आझमी यांना सुनावले.
लोकसभेमध्ये अपयश येऊन ही विधानसभेमध्ये या पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी दाते साहेबांना आमदार बनवले आणि महायुतीकडे आपले मत दिले. याच कारणांमुळे आज दाते साहेब आणि मी वेगवेगळ्या कामांसाठी एकत्रित दौरा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक महायुतीकडून लढवल्या जातील आणि यश हे आपल्या महायुतीच्या बाजूनेच होणार . पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद असो किंवा तालुका पातळीवर पंचायत समिती किंवा नगरपरिषद असो महायुतीची सत्ताच येणार आहे. अश्या शब्दात सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या विजयाबद्दल आपला विश्वास दर्शवला.