ताज्या बातम्या

Sunetra Pawar : देवगिरीवर सुनेत्रा पवारांची पहिली मोठी बैठक; राष्ट्रवादीत मोठे निर्णय होणार?

राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारताच कार्यपद्धतीत गतिमान बदल करण्यास सुरुवात केली आहे

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारताच कार्यपद्धतीत गतिमान बदल करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच मुंबईत दाखल झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आज संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सर्व विधानमंडळ सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिली मोठी बैठक असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाची धुरा सांभाळत त्यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे. आजची बैठक ही केवळ साप्ताहिक आढावा बैठक नसून, पक्षातील शिस्त, रणनीती आणि भविष्यातील दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले असून, अनुपस्थित राहणाऱ्यांवर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कथित लाचखोरी प्रकरणावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रालयात उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे झिरवळ अडचणीत आले असून विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळपासून नरहरी झिरवळ संपर्कात नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आज ते स्वतः सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून, कोअर कमिटीसमोर आपली बाजू मांडणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीत झिरवळ प्रकरणातील सत्यता, उपलब्ध अहवाल आणि पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. सुनेत्रा पवार आणि कोअर कमिटीचे सदस्य वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे केवळ पक्षांतर्गतच नव्हे तर राज्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे.

पक्षाच्या अंतर्गत संरचनेतही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा होणार असून राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी आणि कुठे घ्यायची याचा निर्णयही आज निश्चित केला जाऊ शकतो. येत्या दोन आठवड्यांत संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे समजते.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नव्या दिशेने वाटचाल करणार का, संघटनात्मक बदल कितपत प्रभावी ठरणार आणि झिरवळ प्रकरणाचा शेवट काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आजची बैठक महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा ठरण्याची चिन्हे आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा