कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये मराठी माणसाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं बाहेरच्या टोळीला बोलावून सोसायटीमध्ये मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर सुनील प्रभू म्हणाले की, अत्यंत मानवतेला संवेदना आणणारी आणि काळीमा फासणारी घटना आहे. कल्याणमध्ये योगीधाम नावाची सोसायटी आहे. या योगीधाम सोसायटीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमटीडीसीमध्ये अकाउंटंट असेलेल मॅनेजर अखिलेश शुक्ला राहतात. ते अखिलेश शुक्ला ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीमध्ये विजय कल्वीकट्टे नावाचे एक मराठी गृहस्थ राहतात. विजय कल्वीकट्टे यांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलं त्याठिकाणी वावरत असताना शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात म्हणून त्यांचे आपसात भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की, ते असं म्हणाले तुम्ही काय जाता पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन येईल तुम्हाला परत यावे लागेल.
मराठी माणसावरती हा अन्याय आहे. ते असं म्हणतात मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात. हा मराठी माणसाचा अपमान आहे. कोण आहे हा शुक्ला? मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. त्याने बाहेरची लोक आणून त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. असे सुनील प्रभू म्हणाले.