राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही महत्त्वाची विधानं केली आहे. पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की, "काल माझं माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. मात्र त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ सभागृहाच्या गॅलरीतून शूट करण्यात आल्यावर, यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले की, हा संपूर्ण विषय विधानसभेच्या अखत्यारीतील आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे पूर्ण कामकाज हे विधानसभेच्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली येते."
पुढे ते म्हणाले की, "जे शूटिंग करण्यात आले, कृषिमंत्र्यांच्या बाबतीत जे काही घडलं, ते अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधानमंडळाच्या आत घडलेला प्रकार निंदनीय आहे. कोकाटे यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती यांनी सुरू केली असेलच."
"महाराष्ट्राच्या थोर संस्कृतीची परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केली होती. पूर्वी विरोधकांवर टीका केली जायची, पण ती शाब्दिक असायची. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे विधानं केली जातात, त्याच्या तुलनेत त्या काळातील विरोधाच्या दर्जामध्ये खूप फरक होता असे ते म्हणाले."
"मी स्वतः विधानसभेत आणि विधान परिषदेतील सदस्य म्हणून, तसेच मंत्री म्हणून काम केलं आहे. अलीकडच्या काळात घडलेल्या या घटना अतिशय क्लेशदायक आहेत. या घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या आहेत," असा उल्लेख तटकरे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून यावर भूमिका मांडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात भूमिका मांडलेली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये आज माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होणार असल्याची माहिती खरी आहे. मात्र त्या भेटीतून काय निष्पन्न होणार, हे अजित पवार मला सांगतील तेव्हाच मी सांगू शकेन, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले."
हेही वाचा