दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी सोना कॉमस्टार बोर्डाला पत्र लिहून 25 जुलै रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर कागदपत्रांचा गैरवापर करून कौटुंबिक वारसा जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे पूर्व पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झालं होतं. पोलो खेळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता.
संजय आणि करिश्मा यांचा विवाह 2003 मध्ये झाला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगी समैरा आणि मुलगा कियान. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनीच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. 2014 मध्ये दोघेही घटस्फोटासाठी कोर्टात गेले. त्यांचा घटस्फोट वादग्रस्त ठरला होता. त्यावर 2016 मध्ये कोर्टाने शिक्कामोर्तब केले. घटस्फोटानंतर संजने करिश्माला मुलांचा सांभाळ करण्यासाठी दरमहिन्याला पैसे दिले. तसेच पोटगी म्हणून देखील मोठी रक्कम दिली. घटस्फोटानंतर लगेचच 2017 मध्ये त्यांनी प्रिया सचदेवशी विवाह केला. प्रियाचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी अजारियस कपूर ठेवले. तर, प्रियाच्या पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगीही आहे.
दरम्यान, संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर पासूनच त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण, कोणाच्या वाट्याला किती संपत्ती येणार, यांची चर्चा रंगू लागली होती. त्यातच आता संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी कौटुंबिक वारसा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानं नवीन वादाला सुरूवात झाली आहे.
हेही वाचा