सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्ट करणारा रणवीर अलाहाबादिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्यावर घालण्यात आलेली परदेशी प्रवासावरील बंदी देखील उठवण्यात आली आहे. यामुळे आता रणवीर यांना त्यांच्या पॉडकास्टच्या कामासाठी परदेशात प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमध्ये केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे अलाहाबादिया यांच्याविरोधात देशभरात विविध फौजदारी खटले दाखल झाले होते. या खटल्यांच्या चौकशीदरम्यान त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता.
यापूर्वी 1 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत अलाहाबादिया यांचे वकील अभिज्ञ चंद्रचूड यांनी असा युक्तिवाद केला होता की, सतत प्रवास करणे हे त्यांच्या पॉडकास्ट व्यवसायासाठी आवश्यक आहे. परदेश प्रवासावरील निर्बंधांमुळे त्यांच्या रोजीरोटीवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
महाराष्ट्र आणि आसाम सरकारांनी न्यायालयाला माहिती दिली की, संबंधित एफआयआरच्या चौकशा पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर न्यायालयाने अलाहाबादिया यांना महाराष्ट्र सायबर क्राइम विभागाकडे अर्ज करून पासपोर्ट प्राप्त करण्याची परवानगी दिली. तसेच, त्यांच्यावर लावण्यात आलेली परदेश प्रवास बंदी हटवली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, तपास प्रक्रियेमध्ये जर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले, तर त्यांना सहकार्य करणे बंधनकारक असेल.