वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
फरार असलेल्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्यासमोर ही घटना आली असून हा प्रकार "माणुसकीला काळिमा फासणारा"आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हुंडाबळीचे काळे सावट आजही?
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांनी बोलताना आपली भावना व्यक्त केली, वैष्णवी हगवणेचे प्रकरण अतिशय खेदजनक आहे. समाज म्हणून घडलेली घटना आपल्यासाठी ही लाजिरवाणी आहे. हुंड्याच्या विरोधात देशात फार पूर्वी कायदा झालेला आहे. गुन्हेगार कुणीही असले तरी त्यांना शासन झालेच पाहीजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी त्यात सातत्य ठेवावे. हा सामाजिक विषय असून यात आम्हाला राजकारण करायचे नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली असून घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला.
राजकारण नको, न्याय हवा - सुप्रिया सुळे
"हा सामाजिक विषय असून यात आम्हाला राजकारण करायचे नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी त्यात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
हगवणे कुटुंबावर घणाघाती टीका
“एकाच घरातील दोन सुनांनी पोलिसांकडे तक्रार केली, पाश्चिमात्य कपडे घालूनही बुरसटलेले विचार गेलेले नसतील तर शिक्षणाचा काय उपयोग ? यावरूनच स्पष्ट होते.
वैष्णवीच्या बाळासाठी माणुसकीचा हात
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाला हाल सहन करावे लागले. सहा दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे बाळ तिच्या मूळ कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले," अशा वातावरणात बाळाला ठेवण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. कायदा आपले काम करेल पण आम्ही माणुसकीच्या नात्याने यात लक्ष घालू, अशी भावना सुळे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला नकार..सजगतेचा निर्णय
हगवणे कुटुंब हे सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील असून, एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरातील एका कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी नाकारले होते. "घरातील सुनांनी हिंसाचाराच्या तक्रारी केल्याचे मला समजले होते, म्हणून मी तिथे जाणे टाळले," असे त्या म्हणाल्या.
न्यायासाठी अखेरपर्यंत लढा सुरूच राहील
सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की वैष्णवीसाठी न्याय मिळवून देणं हे त्यांच्या लढ्याचं अंतिम ध्येय आहे. समाजाला जागं करण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्या सातत्याने प्रयत्नशील राहणार आहेत.