राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहार विषयावरून महायुतीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी ‘राम कृष्ण हरी’ म्हणणारी आहे, फक्त तुळशीची माळ मी गळ्यात घालत नाही एवढाच फरक आहे. कारण मी कधीकधी मांसाहार करते. मी खोटं बोलत नाही. मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग इतरांना का त्रास होतो?”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “आम्ही आमच्या पैशाने खातो, कोणाचे मिंधे नाही. मग माझ्या वैयक्तिक आहाराच्या सवयींवर इतरांनी प्रश्न का उपस्थित करावा?”
दरम्यान, या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्यास नकार दिला. मात्र त्यांनी एवढंच सांगितलं की, “यावर माझं उत्तर नाही, महाराष्ट्रातील सर्व वारकरी आपली प्रतिक्रिया यावर देतील" असे ते म्हणाले.