बीडमधील एका शिक्षकाने पगार न मिळाल्याने आयुष्य संपवलं. आश्रम शाळेमध्ये 18 वर्ष नोकरी केल्यानंतरही पगार मिळाला नाही. त्याचप्रमाने संस्थाचलकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुण शिक्षकाने मरणाचा रस्ता निवडला. शिक्षक धनंजय नागरगोजे हे बीडमधील केळगाव शाळेत शिक्षक म्हणून गेली 18 वर्ष काम करत होते. मात्र त्यांना 18 वर्षांपासून पगार मिळाला नव्हता. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. या सगळ्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी गळफास लावून घेत आयुष्य संपवले. या सर्व प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत सरकारला उद्देशून भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो हे राज्याला भूषणावह नाही. शिक्षकांना आदराने 'गुरुजी' म्हटले जाते. हे गुरुजी भावी पिढ्या घडविण्यासाठी सदैव काम करीत असतात. त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत".
पुढे त्यांनी लिहिले की, "शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर अशा घटना घडणार नाहीत. दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असे लिहीत सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.