थोडक्यात
तहसीलदाराला काढून टाकणे हा अन्याय नाही का?
काहीतरी गोलमाल आहे- सुप्रिया सुळे
पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहाराप्रकरणी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील साधारण 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना विकली आहे, असे म्हटले जात आहे. पार्थ पवार यांनी मात्र मी कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. अजित पवार यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विरोधक मात्र अजित पवार यांनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. असे असतानाचा आता अजित पवार यांची बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका व्यक्त केली आहे.
तहसीलदाराला काढून टाकणे हा अन्याय नाही का?
पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे. तहसीलदार आणि तलाठी यांची नोकरी गेली. पण ते म्हणत आहेत की आम्ही सहीच केली नाही. सही केलेली नसतानाही त्यांना कामावर काढून टाकण्यात आले. तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून कामावर काढून टाकण्यात आले. हा अन्याय नाही का? असा रोखठोक सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच तहसीलदार आणि तलाठ्याचे निलंबन अगोदर मागे घ्या, अशी मोठी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.
काहीतरी गोलमाल आहे- सुप्रिया सुळे
पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी तहसीलदारांचं निलंबन करण्यात आलं का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, पार्थ पवार यांना पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर ते म्हणाले की माझी कायदेशीर टीम यावर उत्तर देईल. आता प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकार आपल्याला गोंधळात टाकत आहे. महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की त्या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? तहसीलदराला कामावरून का काढण्यात आले? तहसीलदार सांगतोय की मी सहीच केली नाही. असे असेल तर दाल मे कुछ काला है. काहीतरी गोलमाल आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं
माझं पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं. मी पार्थसोबत सकाळीच बोलले. मी पहिला फोन अगोदर पार्थला केला. तो म्हणतोय की यात माझी काहीही चूक नाही. माझे माझ्या वकिलांशी बोलणे झाले आहे, असे त्याने मला सांगितले. तसेच भविष्यात वकील सगळे कागदपत्रे घेऊन तुमच्यासमोर येतील, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली.