संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यावरच पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच आहे, बाकीचे सगळे प्यादे आहेत अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
काय म्हणाले सुरेश धस ?
पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच आहे, बाकीचे सगळे प्यादे आहेत. चार्जशीटमध्ये पोलिसांनी यावर मोहोर लावली आहे. या तीन गुन्ह्यात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असून, त्याने परळीमध्ये गुंडागर्दी केली. परळीमध्ये स्वातंत्र्य म्हणून काहीच गोष्ट शिल्लक ठेवली नाही, फक्त शाई हाताला लावायची आणि घरी पाठवायची. या सगळ्या प्रकाराला धनंजय मुंडेंनी मूकसंमती दिली आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यांचे पालकमंत्री पद त्यांनी जपलं.
दरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे यावरच प्रतिक्रिया ते म्हणाले की, लवकर तो देखील सापडेल, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अजून यातील पुढील तपासात अजून काहीजण सापडतील.
धनंजय मुंडे राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले की, तो संपूर्ण अधिकार अजित दादांचा आहे, त्यांनी देखील धनंजय मुंडेंवर सोपवलं आहे. दादांच्या भोवती जी लोक आहेत, ती लोक त्यांना योग्य सल्ला देत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पक्षाची हानी केवळ बीड जिल्ह्या पुरती झाली नसून राज्यात झालेली आहे.
बीडमध्ये सगळं वाटोळं करून ठेवलं आहे, बिंदू नियमावलीनुसार सगळे अधिकारी आणले गेले पाहिजे. आकाचे जे लाभार्थी असतील त्यांनी बदलीची मागणी केली असेल, त्यांनी खुशाल बदली करून जावे. आमचा जिल्हा सगळ्यांनी लुटारू सारखा वापरला, आमचा जिल्हा दुबती गाय आहे का? तीन तीन वेळा पिळायची. सगळे पैसे मिळत नसल्याने ज्यांना जायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर जिल्हा सोडावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून बिंदू नियमावलीचा वापर करून अधिकारी ठेवले पाहिजे.