केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर जाऊन अभिवादन करताना केलेल्या भाषणातील एका विधानावरून मोठा गदारोळ झाला आहे. अमित शाह यांनी मुघल बादशहा औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीचा उल्लेख ‘समाधी’ असा केला. त्यांच्याा या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला असून ट्वीटद्वारे त्यांना खडेबोल सुनावले.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “रायगडासारख्या पवित्र भूमीवर उभं राहून औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या कबरीला ‘समाधी’ म्हणणं हे केवळ भाषेतील चूक नाही, तर हे शिवप्रेमींच्या आणि स्वराज्याच्या विचारांवर आघात करणारे आहे. समाधी हा शब्द थोर संत, महापुरुष, देशासाठी बलिदान देणाऱ्यांसाठी वापरला जातो, औरंगजेबसारख्या आक्रमकासाठी नव्हे.”
काय म्हणाले अमित शाह
अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माता जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी त्या संस्कारांवर हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष उभा केला. संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी-संताजी यांनी औरंगजेबाशी शेवटपर्यंत लढा दिला आणि अखेर महाराष्ट्रात त्याचीच ‘समाधी’ बनली. हे शिवचरित्र भारतातील प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे.”